जिल्ह्यात दिवसभरात तब्बल सहा करोनाबाधित सापडले आहेत. यामधील पाच रुग्ण हे नगर शहरातील असून एक रुग्ण पारनेर येथील आहे. पारनेर येथील रुग्णाचा कालच मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ६० झाली आहे.
सारसनगर येथील बाधित आढळलेली व्यक्ती ही ड्रायव्हर असून त्याने पुणे-मुंबई प्रवास केला आहे. या व्यक्तीला दोन दिवसापूर्वी सर्दी, खोकला याचा त्रास होऊ लागल्याने त्याला सुरुवातीला खासगी रुग्णालयात आणि नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच त्याच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज सकाळी अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही व्यक्ती करोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. काल सुभेदार गल्ली येथील एका महिलेला करोना झाल्याचे समोर आले होते. या महिलेच्या निकट संपर्कातील व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हे अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाले असून त्यात या महिलेचा मुलगा, सून आणि शेजारी यांनाही करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तसेच त्या महिलेने ज्या खासगी डॉक्टरकडे उपचार घेतले होते, तेथील रिसेप्शनिस्टही करोनाबाधित आढळून आली आहे.दरम्यान, पारनेर तालुक्यातील निघोज येथील एका व्यक्तीचा काल मृत्यू झाला होता. त्याचा अहवालही आज पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्ह्यातील संख्या ६० वर
अहमदनगर जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता ६० झाली आहे. त्यापैकी ४० जणांचे चौदा दिवसानंतर करण्यात आलेल्या स्त्राव चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले असून त्यांना हॉस्पिटलधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जामखेड, पारनेर, कोपरगाव, धांदरफळ (ता.संगमनेर) येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उर्वरीत १६ रुग्णांवर आयसोलेशन वार्ड मध्ये उपचार सुरू आहेत.