आंबेडकरांचा फिगर गेम! वंचित मविआसोबत लढणार की नाही? बुचकळ्यात पाडणारा गुंतागुंतीचा खेळ नेमका का

[ad_1]

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि खास करून काँग्रेससोबत (Congress) ‘फिगर गेम’ खेळतायत का?, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना एक पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी मविआत काँग्रेसच्या वाट्याला येत असलेल्या जागांपैकी सात जागांवर त्यांना बिनशर्त पाठींब्याचा प्रस्ताव दिला आहे. एकीकडे आंबेडकरांच्या महाविकास आघाडीसोबत जाण्यावर प्रश्नचिन्ह लागलेलं असतांना आंबेडकरांचा हा नवा प्रस्ताव सर्वांनाच बुचकळ्यात पाडणारा आहे. 

प्रकाश आंबेडकरांचा फिगर गेम

प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत जाणार का? सध्या राज्याच्या राजकारणात सर्वात चर्चेत असलेला हा प्रश्न. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीत ‘हा खेळ आकड्यांचा’ सुरू आहे. मात्र, या आकड्यांचा खेळ सापशिडीसारखा गुंतागुंतीचा होत चालला आहे. याला कारण आहे, आंबेडकरांनी वेळोवेळी फेकलेलं जागांच्या आकड्यांचं जाळं. 

आंबेडकरांचे प्रस्ताव आणि आकडे

  • आंबेडकरांनी सर्वात आधी महाविकास आघाडीतील त्यांच्यासह चारही पक्षांनी प्रत्येकी 12 जागा लढवाव्यात हा प्रस्ताव दिला होता. 
  • त्यानंतर त्यांच्या जागांच्या प्रस्तावाचे आकडे वेळोवेळी बदलत गेले. 
  • कधी ते 13 झाले, तर कधी 9 झाले. 
  • आता अगदी अलिकडे त्यांनी महाविकास आघाडीला 16 जागांचा नवा प्रस्ताव दिला होता. 

मविआसोबतच्या बैठका निष्फळ

कधी जागांवर तर कधी महाविकास आघाडीच्या बैठकीच्या निमंत्रणावरून आंबेडकर आणि मविआत तणातणी झाली. 30 जानेवारीला आंबेडकरांचे प्रतिनिधी पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या बैठकीला गेले. मात्र, त्यानंतर तेथे त्यांच्या प्रतिनिधींना चांगली वागणूक न मिळाल्याचं सांगत त्यावर वाद झाले. त्यानंतरच्या दोन बैठकांना स्वत: आंबेडकर उपस्थित होते. मात्र, त्यातून आतापर्यंतही काहीच निष्पन्न झालं नाही. 

महाआघाडीतील वाटपाचा फॉर्म्युला ठरला

महाविकास आघाडीला आंबेडकर सोबत येतील याबद्दल शंका आहे. त्यामुळे महाआघाडीतील तीन पक्षांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम केला आहे. यात ठाकरेंच्या सेनेला 22, काँग्रेसला 16 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 असा फॉर्म्युला ठरला आहे. जर आंबेडकर मविआसोबत आले, तर हाच फॉर्म्युला सेनेला 20, काँग्रेसला 15,शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 9 आणि वंचित 4 असा ठरलाय. मात्र, वंचित चार जागांवर आघाडी करायला तयार नाही. त्यामुळेच मविआने आंबेडकरांना मंगळवारी संध्याकाळपर्यंत सोबत येण्यावर भूमिका स्पष्ट करण्याचा अल्टीमेटम दिल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, वंचितनं त्याचा इन्कार केला आहे. आंबेडकरांनी अलिकडे काँग्रेसवर शेलकी टीका केली, त्यानंतर त्यांनी आता काँग्रेसला दिलेला प्रस्ताव अतिशय गोंधळात टाकणारा आहे. 

2019 च्या निवडणुकीतही आंबेडकर आणि काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडीसाठी अशाच घटनाक्रमांचा ‘फ्लॅशबॅक’ घडला होता. या राजकीय चित्रपटाचा ‘क्लायमॅक्स’ 2019 मध्ये आघाडी न होण्यानं झाला होताय. तो यावेळीही तसाच होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *