कोपरगाव – कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील 20 गावांत सामाजिक सभागृह बांधण्यासाठी ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत दोन कोटी रुपयांचा निधी उपसचिव मनोज जाधव यांनी मंजूर केल्याची माहिती आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.
आ. कोल्हे म्हणाल्या, राज्याच्या ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंढे यांच्याकडे यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार 20 गावांतील सामाजिक सभागृहांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यात सोनारी, मोर्विस, आंचलगांव, कान्हेगाव, घोयेगाव, डाउच बुद्रुक, देर्डे कोऱ्हाळे, अंजनापूर, काकडी, मायगावदेवी, शहापूर, करंजी, धामोरी, चांदेकसारे, जेऊर कुंभारी, उक्कडगाव, डाऊच खुर्द, रस्तापूर, एलमवाडी, व धनगरवाडी येथील सामाजिक सभागृहांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपये मंजूर झाले आहेत.
रस्त्यांची दर्जोन्नतीसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मतदार संघातील नऊ रस्त्यांच्या कामासाठी 11 कोटी 9 लाख 44 हजार रुपयांच्या खर्चासही नुकतीच मंजुरी मिळविली आहे. कोपरगाव शहर व मतदारसंघातील अन्य विकासकामांचे प्रस्ताव आचारसंहितेच्या आत मंजूर करण्यावर आपला भर असून, त्यासाठी संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही आ. कोल्हे यांनी सांगितले.