राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

[ad_1]

Maharashtra Rain : गेल्या अनेक दिवसापासून राज्यात पावसानं (Rain) दडी मारली होती. मात्र, आता पुन्हा राज्याच्या काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. पावसानं हजेरी लावल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये (Farmers) आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तब्बल महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर पाऊस होत आहे. राज्यातील नंदुरबार, वाशिम, परभणी, अमरावती, भंडारा या जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 

नवापूर शहर आणि परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात

नंदुरबार नवापूर तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून पावसानं दडी मारली होती. हवामान खात्यानं येत्या तीन दिवसात जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार नवापूर शहर आणि परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील भात पीक उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. तर दुसरीकडे या पावसामुळं पिकांना जीवदान मिळाले असले तरी अजून दोन-तीन दिवस पाऊस असाच सुरू राहिला तर परिसरातील पिण्याच्या पाण्याची ही समस्या मार्गी लागणार आहे. मात्र, रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. समाधानकारक पावसामुळं शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.

वाशिम जिल्ह्यातही पावसाची जोरदार हजेरी

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील अनेक भागात जोरदार पावसानं हजेरी लावली. दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं खरिपाची पीकं संकटात आली आहेत. पाऊस बरसल्यानं सुकणाऱ्या पिकाला नवसंजीवनी मिळाली आहे. तर पावसाच्या आगमनाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. 

परभणी शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी

मागच्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं परभणी शहरासह जिल्ह्यातील विविध भागात दमदार हजेरी लावली. दुपारी आणि सायंकाळच्या सुमारास जवळपास अर्धा तास दमदार पाऊस झाला. नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. शिवाय शेंगा भरण्याच्या अवस्थेत कोमेजून जात असलेल्या सोयाबीनला जीवदान मिळाले आहे. परंतू जिल्ह्यात अजूनही मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.

अमरावतीत जोरदार पाऊस

अमरावती शहरात वादळी वारा, ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. जवळपास एक महिन्याच्या खंडानंतर बरसलेल्या या पावसामुळे नागरिकांना  उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र, अचानक आलेल्या या पावसामुळं वाहन चालक आणि पादचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. अमरावती शहरात मागील एक महिन्यात काही तुरळक प्रमाणात पडलेला पाऊस सोडला तर दिलासादायक पाऊस झालेला नव्हता.

भंडाऱ्यात पावसाची हजेरी, शेती पिकांना मोठा दिलासा 

सकाळपासून प्रखर ऊन्ह असताना दुपारी अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली. मागील काही दिवसांपासून उष्णतेत वाढ निर्माण झाली होती. अशात आलेल्या मुसळधार पावसानं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हा पाऊस शेतातील पिकांना लाभदायक ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Nashik : नाशिक जिल्ह्यातील 92 पैकी 55 मंडळात 21 दिवसांपासून पाऊस नाही, 40 टक्के पाऊस कमी, शेतीपिकांना मोठा फटका 

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *