अहमदनगर : केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय आयुष मिशन’कार्यक्रमाअंतर्गत नगर जिल्ह्यासाठी आयुष रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. या रुग्णालयासाठी सरकारने नऊ कोटी रुपये निघी मंजूर केला आहे. त्यानंतर जिल्हा रुग्णालयाने कार्यवाही करून रुग्णालयासाठी जागा निश्चित करून नकाशे तयार केले आहेत. आता लवकरच याबाबत टेंडर प्रसिद्ध करण्यात येणार असून, प्रत्यक्षात जून महिन्यापासून कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
महिनाभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तत्पूर्वीच टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान जिल्हा रुग्णालय प्रशासनासमोर आहे. अॅलोपॅथी उपचारांना पर्याय तसेच रुण्गांना आयुर्वेदापासून होमिओपॅथीपर्यंतचे उपचार मिळण्यासाठी आयुष हॉस्पिटल सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
आयुर्वेद, होमिओपेथी, योगा, युनानी, सिद्ध यांसारख्या उपचार पद्धतींचा यामध्ये समावेश आहे. या उपचार पद्धतींचा प्रचार व प्रसारास सुरुवात करण्यात आली आहे. या अंतर्गत नगरमध्ये रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. या रुग्णालयासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने जागा निश्चित केली आहे. रुग्णालयाच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये रुग्णालयासाठी नऊ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता.