जि. प.कडून कोपरगावला आतापर्यंत 52 कोटींचा निधी- शालिनी विखे

कोपरगाव – जिल्हा परिषदेच्या विविध योजना ग्रामीण भागात राबविण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असतो. कोपरगाव तालुक्‍यातील विविध विकासकामांसाठी आतापर्यंत सुमारे 52 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी दिली.


तालुक्‍यातील आपेगाव येथील विविध विकासकामांचे उद्‌घाटन व लोकार्पण सोहळ्यात अध्यक्षा विखे बोलत होत्या. जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते कारभारी आगवण, पंचायत समिती सदस्या वर्षा दाणे, गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, उपअभियंता उत्तम पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. सरपंच शिवनाथ खिलारी यांनी स्वागत केले. पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


परजणे पाटील म्हणाले, मूलभूत समस्या सोडविण्याची राज्यकर्त्यांनी मानसिकता ठेवावी. मात्र येथे एकाने कामे मंजूर करुन आणायचे आणि त्याचे श्रेय दुसऱ्यानेच लाटायचे, असे प्रकार सुरू आहेत. तालुक्‍यातील प्रस्तापितांनी तिसरी शक्ती उदयाला येऊ दिली नाही. त्यामुळे जनता वैतागली असून, आता राजकीय परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे जनतेने देखील योग्य निर्णय घेण्याची आता वेळ आलेली आहे.
नानासाहेब सिनगर, उत्तमराव माने, अशोकराव काजळे, गोरखनाथ शिंदे, सुदामराव शिंदे, दादा टुपके, मच्छिंद्र महारज, लक्ष्मणराव साबळे, बाळासाहेब दहे, प्रकाश शेटे, शंकरराव परजणे, शिवाजी वरगुडे, बद्रीनाथ वल्टे, रामभाऊ निकम, परभतराव निकम, ग्रामसेवक संजय काटे उपस्थित होते. उपसरपंच राजेंद्र भुजाडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *