राज्यात आज ४४ करोनाबळी, १६०२ नवे रुग्ण; एकूण बाधित २७ हजारपार

राज्यात आज करोनामुळे ४४ रुग्णांचा बळी गेला असून दिवसभरात १६०२ नवीन रुग्णांची भर पडलीय तर ५१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील करोबाधित रुग्णांची एकूण संख्या आता २७ हजार ५२४ इतकी झाली आहे.

राज्यात करोनाचा कहर कायम आहे. राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या आज २७ हजार ५२४ वर पोहचली आहे. आज १६०२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ५१२ करोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ६०५९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या प्रत्यक्षात २० हजार ४४६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ४० हजार १४५ नमुन्यांपैकी २ लाख १२ हजार ६२१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २७ हजार ५२४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख १५ हजार ६८६ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून १५ हजार ४६५ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.


आज राज्यात ४४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांची संख्या १०१९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईमधील २५, नवी मुंबईत १०, पुण्यात ५,औरंगाबाद शहरात २, पनवेलमध्ये १ तर कल्याण डोंबिवलीमध्ये १ मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत आज नमूद करण्यात आलेले मृत्यू दि. १४ एप्रिल ते १४ मे या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी ३१ पुरुष तर १३ महिला आहेत. ४४ मृतांमध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील २१ रुग्ण आहेत तर २० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ३ जण ४० वर्षांखालील आहेत. या ४४ रुग्णांपैकी ३४ जणांमध्ये ( ७७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *