BLOG Mohammed Rafi Indian Playback Singer Mohammed Rafi Death Anniversary Special Blog By Avinash Chandane

[ad_1]

BLOG : चार दशके उलटली… दोन पिढ्या झाल्या… अनेक नवीन गायक उदयास आले आणि विस्मृतीतही गेले… मात्र ज्यांच्या सुरेल आवाज ऐकल्याशिवाय आजही बहुतांश भारतीयांचा एकही दिवस जात नाही ते महान गायक म्हणजे मोहम्मद रफी (Mohammed Rafi). रफीसाहेबांचा 31 जुलैला 43 वा स्मृतीदिन आहे.

मोहम्मद रफी म्हणजे भारतीय संगीत क्षेत्राला पडलेलं एक सुंदर स्वप्न म्हणावं लागेल. संगीताच्या सप्तसुरांपैकीच एक म्हणजे रफीसाहेब. त्यांनी हे जग सोडलं त्याला आज ४३ वर्षे झालीत. मात्र, ते गेले ते केवळ शरीराने. कारण गायकीने ते आजही आपल्यात आहेत आणि तोच आनंद रफीसाहेब आजही आपल्याला देत आहेत. अतिशय शांत चेहरा, तेवढाच गोड स्वभाव. कधीही कुणाशीही न भांडलेला माणूस म्हणजे रफीसाहेब. भले तात्विक वाद झाले असतील पण, रफीसाहेबांना मन अगदी एखाद्या बालकासारखं निर्मळ होतं. अशा या भल्या गायकानं भारतीय संगीतातलं काय गायचं बाकी ठेवलं होतं, हाच खरा प्रश्न आहे.

गानगंधर्वाचा जन्म

रफीसाहेबांचा जन्म पंजाबमधला. 24 डिसेंबर 1924 रोजी या गानगंधर्वाचा या भूतलावावर जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांचा गाण्याकडे ओढा होता. इतका की गावात येणाऱ्या फकिराची ते गाणी गात. एकदा गंमत झाली. त्याकाळात गायकांचे महागुरू के. एल. सैगल यांच्या गाण्याचा कार्यक्रम शेजारच्या गावात होता. या कार्यक्रमासाठी रफीसाहेब त्यांचा भाऊ हमीदसोबत गेले होते. पण सैगलसाहेब तोपर्यंत न आल्याने लोकांमध्ये चुळबुळ सुरू होती. अखेर लोकांना शांत करण्यासाठी छोट्या रफीला गाऊ देण्याची विनंती हमीदने आयोजकांना केली. आयोजकांनी विनंती मान्य करून रफींना गायला दिलं. आणि माईकशिवाय रफीसाहेबांनी खणखणीत आवाजात गायलेल्या गाण्यावर प्रेक्षकांमध्ये बसलेले संगीत दिग्दर्शक शामसुंदर फिदा झाले. याच शामसुंदर यांनी रफीसाहेबांना गाण्याची पहिली संधी दिली ती ‘गुलबलोच’ या पंजाबी सिनेमात. त्याच वर्षी ‘गाव की गोरी’ या चित्रपटासाठी रफीसाहेबांना आणखी एक संधी मिळाली. ही गोष्ट आहे 1944 सालची. असं असली तरी रफीसाहेबांना खरी लोकप्रियता मिळवून दिली ती ‘अनमोल घडी’ या चित्रपटानं. 1946 मध्ये झळकलेल्या या सिनेमातील गाणी खूप गाजली. त्यानंतर रफीसाहेब लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार झाले ते कायमचेच.

रफीचं पार्श्वगायन म्हणजे कलाकारांचा आवाज

रफीसाहेबांचं गाणं म्हणजे साक्षात पडद्यावरचा नायकच गातोय की काय असा भास व्हायचा. कारण गीत गाण्यापूर्वी ते सिनेमाची कथा आवर्जून ऐकायचे आणि नायक कोण आहे हेदेखील जाणून घ्यायचे. म्हणूनच त्यांचं गाणं प्रत्येक नायकाला आपलं वाटायचं. शम्मी कपूरचा धुसमुसळेपणा, देव आनंदचा नटखटपणा, दिलीप कुमार यांचा रोमॅन्टिक अंदाज, धर्मेंद्रचा रांगडेपणा, राजेंद्रकुमारचा लव्हरबॉय त्याचवेळी भारतभूषण यांचा साधेपणा रफीसाहेबांच्या गाण्यांतून सहज प्रतिबिंबित व्हायचा. शम्मी कपूरसाठी ‘याहू, चाहे कोई मुझे जंगली कहे…’ हे गाणारे रफीसाहेब आणि भारत भूषण यांच्यासाठी ‘मन तरपत हरी मन…’ गाणारे रफीसाहेब वेगळे आहेत का, असा प्रश्न पडायचा.

मुलीचा निकाह आणि ‘बाबूल की दुवाए…’

‘नीलमकल’ या चित्रपटातील ‘बाबूल की दुवाए लेती जा…’ हे 1968 मध्ये रफीसाहेबांनी गायलेलं गीत म्हणजे मैलाचा दगड होतं. लग्नानंतर मुलीला निरोप देणारा बाप अत्यंत भावूक होतो, याचं चित्रिकरण यात आहे. हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की, आजही कुठलंही लग्न या गाण्याशिवाय लग्न पूर्ण होत नाही.

या गाण्याची खास आठवण त्यावेळी रफीसाहेबांनी बीबीसीच्या मुलाखतीत सांगितली होती. रफीसाहेबांचा त्यांच्या मुलीवर अतिशय जीव होता. ‘बाबूल की दुवाए लेती जा…’ हे गीत गाण्यापूर्वी दोन दिवस अगोदरच त्यांच्या मुलीचा निकाह झाला होता. परंतु मुलीच्या लग्नातही न फुटलेला त्यांच्या भावनांचा बांध चित्रपटातील हे गाणं गाताना फुटला होता.

रफीसाहेबांच्या अनेक आठवणी सांगितल्या जातात आणि त्यातून त्यांच्या माणुसकीचं दर्शन होतं. विशेष म्हणजे निवृत्त वादकांच्या कुटुंबीयांना रफीसाहेब मदत करायचे, ही बाब रफीसाहेबांच्या निधनांनंतर बऱ्याच दिवसांनी त्यांच्या कुटुंबीयांना कळली. एकीकडे न केलेल्या दानाचे धिंडोरे पिटणारे लोक तर दुसरीकडे एका हाताने केलेलं दान दुसऱ्या हातालाही कळू न देणारे रफीसाहेब म्हणजे साक्षात देवमाणूसच होते.

भिकाऱ्यासाठी गाणारे रफीसाहेब

सात-आठ वर्षांपूर्वी गायक सोनू निगमचा बेगर अक्ट खूप गाजला होता. सोनू निगमनं भिकाऱ्याच्या वेशात रस्त्यात बसून गाणं गायलं होतं आणि त्याला बऱ्यापैकी भिक मिळाली होती.  तो सोनू निगम आहे, कुणालाही ओळखता आलं नव्हतं. परंतु त्याच्या आवाजाची अनेकांनी दखल घेतली होती. पण असा प्रसंग प्रत्यक्षात रफीसाहेबांच्या आयुष्यात घडल्याची आठवण ज्येष्ठ चित्रपट समीक्षक इसाक मुजावर यांनी एका मुलाखतीत सांगितली होती.

एक भिकारी जीव तोडून गात होता. कुणीही त्याची दखल नव्हते. रस्त्यावरून जाणाऱ्या रफीसाहेबांच्या ही बाब लक्षात आली आणि लगेचच ते भिकाऱ्याला बाजूला बसून गाऊ लागले. रफीसाहेबांच्या गाण्याची जादूच अशी काही होती की लोक थांबून त्यांचं गाणं ऐकू लागले. आणि काही वेळातच तब्बल ४०० रुपये जमले होते. तो काळ लक्षात घेतला तर रफीसाहेबांना प्रत्यक्ष कुणीच ओळखत नव्हतं. कारण ते पडद्यामागचे कलाकार होते. त्यामुळे ना लोकांनी रफीसाहेबांनी ओळखलं नाही आणि भिकाऱ्यालाही हा भला माणूस कोण हे कळलं नाही. त्यानंतर तिथून जाताना रफीसाहेबांनी स्वत:ची शाल भिकाऱ्याच्या अंगावर टाकली.
 
गायक म्हणून रफीसाहेब ग्रेट होतेच आणि माणूस म्हणूनही ते खूप मोठ्या मनाचे होते. ते हिंदीबरोबरच अनेक भाषांमध्ये गायलेत. त्याच्या मराठी गाण्यांचा उल्लेख न करणं कृतज्ञपणा ठरू शकतो.

मराठीशी नातं

रफीसाहेबांना मराठीत आणलं ते संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी. शूरा मी वंदिले (1965) या चित्रपटासाठी श्रीकांत ठाकरे यांनी रफीसाहेबांकडून ‘अरे हे दुखी जीवा बेकरार होऊ नको’ हे पहिलं मराठी गाणं गाऊन घेतलं. संगीतकार श्रीकांत ठाकरे आणि रफीसाहेबांची खूप चांगली मैत्री होती. त्यानंतर रफींची मराठी गाणी गायची इच्छा वाढली आणि मग ठाकरे-रफी ही जोडी जमली. त्यानंतर ‘प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा’, शोधिसी मानवा, प्रभू तू दयाळा, हे मना आज कोणी, हा छंद जीवाला लावितसे, अग पोरी संभाल दर्याला तुफान आयलंय भारी अशी एकाहून अनेक सरस गीतं त्यांनी गायली आणि ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे रफीसाहेबांना ‘च’चा उच्चार येत नव्हता. त्यामुळे त्यांच्यासाठी गाणी लिहून घेताना श्रीकांत ठाकरेंनी गीतकारांना तशा सूचना दिल्या होत्या.

संगीतकारांची पसंती

रफीसाहेबांनी तत्कालीन सर्व संगीतकारांसोबत काम केलं. नौशादजींचा त्यांच्यावर खास लोभ होता. प्रत्यक्षात सर्व संगीतकारांनाही ते आपले वाटायचे. रफीसाहेबांनी भजनापासून रोमॅन्टिकपर्यंत आणि बालगीतांपासून देशभक्तीपर सर्व प्रकारची गीते गायली आणि प्रत्येक गीत प्रकारावर स्वताची छाप सोडली.

अशी ही महान व्यक्ती 31 जुलै 1980 रोजी अल्लाला प्यारी झाली. त्या दिवशी पावसालाही त्यांचं अंतिम दर्शन घेण्याचा मोह आवरला नाही. मुंबईत धोधो पाऊस कोसळत होता. तरीही त्यांच्या जनाजासाठी हजारोंच्या संख्येने लोक होते. एवढ्या प्रचंड संख्येनं लोकांचं प्रेम मिळालेले कदाचित ते एकमेव कलाकार असावेत. 

काहींचं आयुष्य हे इतरांना सुखी करण्यासाठीच असतं. रफीसाहेबांनी त्यांच्या हयातीत सर्वांना भरभरून दिलं आणि निधनानंतरही त्यांची गाणी चाहत्यांना आनंद देत आहेत. दिल एक मंदिर या चित्रपटात रफीसाहेबांचंच गाणं आहे,’जाने वाले कभी नही आते, जाने वालों की याद आती है…’ रफीसाहेबांसाठी हे गाणं तंतोतंत लागू होतं.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *