Blog On Poet N D Mahanor By Sameer Gaikwad Detail Marathi News

[ad_1]

BLOG : महानोर तुम्हीच सांगा आता, या भुईच्या दानाचे करायचे काय?   

तुम्ही गेलात आणि शिवारं उदासली.
रानामळ्यातली हातातोंडाशी आलेली तेजतर्रार पिकं मलूल झाली.

गोठ्यातल्या गायी मौन झाल्या, 
माना तुकवून उभी असलेली कुसुंबी झाडं थिजली

उजाड माळांवरुन भिरभिरणारं वारं सुन्न झालं!
हिरव्याकंच घनदाट आमराईने शांततेचं काळीज चिरणारी किंकाळी फोडली!
विहिरींच्या कडाकपारीत घुमणारे पारवे स्तब्ध झाले

गावाकडच्या वाटेवरल्या पाऊलखुणा गहिवरल्या
घरट्यांतल्या पाखरांचा किलबिलाट निमाला

उंच गगनात विहरणारे पक्षांचे थवे एकाएकी विखुरले
पाऊसओल्या मातीस गलबलून आले

तुम्ही गेलात अन् वसुंधरेची हिरवाईही रुसली
अजिंठ्यातली चित्रे गदगदली, 
वेरूळच्या लेण्यांचे हुंदके दाटले
पाऊसधाराही गहिवरल्या

सखीच्या चांदणगोंदणातली नक्षी फिकी झाली
रानातल्या पाऊलवाटांवर रुळणारा पैंजणनाद विरुनी गेला

आकाश पांघरोनी मन दूरदूर गेले
भरदुपारीच रानात झाली एककल्ली सुनसान सांजवेळ

‘डोळ्यांच्या गलबतांतले मनमोर’ निघून गेले
गात्रात कापणारा ओला पिसारा सावनी हवेआधीच घुसमटला
केसांत मोकळ्या या वेटाळुनी फुलांना, उमलून कुणी न येई आता!
 
‘मन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले
त्या राजवंशी कोण्या डोळ्यांत गुंतलेले’ आता शोधायचे कोठे?
गाण्यात सांडलेलं काचबिंदी नभ उभं वेचायचे कसे?

मातीच्या गर्भातल्या बीजांचे, सांगा आता अश्रू कुणी पुसावे?
गहिवरल्या बांधांनी कुठे पहावे?

पाऊस सरता पोटऱ्यातल्या गव्हाचे हसू ओंब्यात दाटेल, 
त्याच्याशी खेळायचे कसे?

आंब्याच्या झाडाला मोहोराचा वास झेपेनासा होईल 
तेव्हा त्याला सावरायचे कसे?

गाभुळ्या चिंचेला नवतीचा भर पोटी धरवणार नाही 
तिला झुलवायचे कसे?

सरते शेवटी इतके तरी सांगा, 
अक्का गेल्यानंतर तुम्ही उदास झालात अन् त्यांच्या वाटेवर निघून गेलात
यंदाच्या मौसमात जुंधळयास चांदणे लगडलेच नाही तर तुम्हाला शोधायचे कुठे?

आम्हाला तुमच्याशी बोलायचे नाही, आम्ही रूसलोय तुमच्यावर. 
आम्ही हे बोलू तरी शकतो पण, पण – 

गोठ्यातल्या गायींच्या अश्रुंना तर आवाजही नाही 
काळ्यातांबड्या मातीतल्या हिरवाईला तर वाणी ही नाही!

महानोर तुम्हीच सांगा आता, त्यांनी रडायचे तरी कुणाच्या कुशीत?
ते सारे हमसून हमसून रडताहेत, त्यांचे सांत्वन तरी करायचे कुणी?
सांगा त्यांचे सांत्वन करायचे कुणी?

पळसखेडची गाणी आता मुकी होतील, ती गायची कुणी
रातझडीचा पाऊस काळजात घर करुन राहील, त्याला निरोप द्यायचा कुणी?

या भुईच्या दानाचे करायचे काय, दान अर्ध्यावर टाकून गेलात तुम्ही!
तुम्ही असे जायला नको होते. नको होते..   

– समीर गायकवाड

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *