[ad_1]
Palghar Rain Updates: पालघर जिल्ह्याच्या (Palghar District) जव्हार (Jawhar), मोखाडा (Mokhada), विक्रमगड (Vikramgad) या दुर्गम भागात ग्रामीण गावपाड्यांना जोडणारे रस्ते आणि पूल नसल्यानं नागरिकांना वाहत्या नद्यांमधील पाण्याच्या धोकादायक प्रवाहातून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचं वारंवार उघड होत आहे. मोखाडा तालुक्यातील कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील जवळपास चार ते पाच पाड्यांना जोडणारा पिंजाळ नदीवर पूल नसल्यानं येथील नागरिकांना वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्यां धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा उघड झालं आहे.
कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील शेंड्याचा पाडा, आंबे पाडा, रायपाडा आणि जांभूळपाडा या पाड्यांमधील नागरिकांना पावसाळ्यात नदीच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. या पाड्यांची लोकसंख्या 500 पेक्षाही अधिक आहे. मात्र गावाबाहेर पडण्यासाठी येथील ग्रामस्थांना पिंजाळ नदी पार करावी लागत आहे. या नदीवर पूल नसल्यानं ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात चारही महिने पिंजाळ नदी दुधडी भरून वाहत असून या काळात गावात शिक्षकही पोहोचू शकत नसल्यानं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशीही खेळ सुरू आहे. आज सुरेखा लहू भागडे या गरोदर महिलेला उलट्या व्हायला लागल्या, एका बाजूनं नदीला पूर, तर दुसऱ्या बाजूनं रस्ता नाही म्हणून तिला गावकऱ्यांनी चादरीची डोली करून भर पुरातून लाकडावरती नदी पार करून दवाखान्यात नेलं. पावसाळ्यात हे भोग गावकऱ्यांच्या पदरीच पडलेले. गावात कोणी आजारी पडल्यास लाकूड आणि चादरीच्या साहाय्यानं डोली करून येथील रुग्णांना लाकडी फळीच्या आधारावर नदी पार करावी लागते.
मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी पिंजाळ नदीवर पूलाची मागणी होत असून याकडे प्रशासन आणि सरकार मात्र डोळेझाक करत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे लवकरात लवकर पिंजाळ नदीवर पूल उभारून शेंड्याचा पाडा, आंबे पाडा, रायपाडा आणि जांभूळपाडा या गावातील नागरिकांना गावाबाहेर पडण्यासाठी दिलासा द्यावा, अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे .
पालघर जिल्ह्यात आजही शेकडो गावपाड्यांवर जाण्यासाठी मुख्य रस्ते नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात येथील नागरिकांना गावाबाहेर ये-जा करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे. मुंबई, ठाणे या महानगरांलगत असलेल्या पालघर जिल्ह्यात हे भीषण वास्तव दिवसेंदिवस उघड होत असून सरकार याची दखल कधी घेणार? असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जात आहे.
[ad_2]
Source link